जाधव यांना परत आणा

(लोकसत्ता - अन्वयार्थ)
कुलभूषण जाधव हे नौदलातील निवृत्त कमांडर आहेत. ते एक व्यावसायिक आहेत. निदान तसे सांगितले जाते. ते रिसर्च अँड अनालिसिस विंग (रॉ)चे गुप्तचर आहेत की काय याबद्दल मात्र संभ्रम आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार ते अजूनही नौदलात असून, रॉसाठी हेरगिरी करीत होते. या आरोपाखाली त्यांना पाकिस्तानी पोलिसांनी बलुचिस्तानातून अटक केली. बलुचिस्तान आणि कराचीतील पाकविरोधी कारवायांमध्ये आपला हात असल्याचे त्यांनी कबूल केल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे. भारतीय परराष्ट्र खात्याने त्याचा साफ इन्कार केला आहे. भारताच्या म्हणण्यानुसार त्यांनी मुदतीपूर्वीच नौदलातून निवृत्ती घेतली असून त्यांचा रॉशी संबंध नाही. यातील खरे-खोटे कदाचित कधीच उजेडात येणार नाही. अशा प्रकरणांत सत्यालाही अनेक चेहरे असू शकतात. बलुचिस्तानात भारताचे हेर पाकविरोधी कारवाया करीत असल्याचे पाकिस्तानी माध्यमांचे म्हणणे आहे. तेथे स्वातंत्र्यवादी चळवळी सुरू आहेत. त्यांना भारतातून खतपाणी घातले जात असणार यात शंका नाही. रॉचा इतिहास अशा शंका घेण्यास परवानगी देत नाही. परंतु अशा गोष्टी कोणताही देश जाहीरपणे मान्य करीत नसतो. अखंड पाकिस्तान हा उपखंडातील स्थैर्यासाठी आवश्यक असल्याचे भारताने नेहमीच म्हटले आहे. हे भारताचे परराष्ट्र धोरण झाले. ते गुप्तचर संस्थांच्या धोरणाशी मेळ खाणारेच असते असे म्हणणे हा बावळटपणा झाला.
पाकिस्तानी बलुचिस्तानात ग्वादर येथे चीन बंदर उभारत आहे. त्यापासून काही मैलांच्या अंतरावर, इराणी बलुचिस्तानातील छाबहार बंदराचा विकास भारताच्या मदतीने केला जात आहे. भारतीय उपखंडातील समुद्री वर्चस्वाचा हा खेळ आहे. त्यात जाधव यांच्यासारख्या निवृत्त नौदल अधिका-याची भूमिका नेमकी काय आहे याबद्दल खात्रीने काहीच सांगता येत नाही. ते हेर आहेत असे मानले तरी काही प्रश्न उभे राहातात. हेरगिरीसाठी प्रत्यक्ष मैदानात कमांडर पातळीवरील अधिका-याला क्वचितच पाठविले जाते. असा हेर जेव्हा कामगिरीवर जातो तेव्हा तो आपले भारतीय पारपत्र घेऊन जात नसतो. त्यासाठी तिस-याच देशाचे पारपत्र नेले जाते. कुलभूषण यांच्याकडे मात्र भारतीय पारपत्र सापडले आहे. त्यावर नाव हुसेन मुबारक पटेल असे आणि पत्ता सांगलीचा असल्याचे पाकिस्तानी माध्यमांतून आले आहे. एकंदर सगळेच संशयास्पद आहे. त्यात तथ्य असल्याचे म्हटले, तर जाधव यांचे मोल अधिकच वाढते तथ्य नसले, ते सर्वसामान्य व्यावसायिक असले तरी त्यांचे मोल कमी होत नाही. हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेल्या सरबजीत सिंगचा तुरूंगातच कैद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ते भोग जाधव यांच्या वाट्याला येता कामा नयेत. केवळ सरबजीतच्या बहिणीचीच नव्हे, तर देशवासीयांची ही अपेक्षा आहे. ती पूर्ण करणे हे केंद्राचे कर्तव्य आहे. याबाबत सरकारने पुरेशी संवेदनशीलता दाखविण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे हेरांच्या फिल्मीकथांना मोठा भाव असतो. प्रत्यक्ष हेरांना मात्र किंमत नसते हे याआधी रवींद्र कौशिक किंवा मोहनलाल भास्कर यांच्या प्रकरणात दिसून आले आहे. कौशिक यांचा पाकिस्तानी तुरूंगात क्षयरोगाने मृत्यू झाला. त्यांचा भारताशी संबंध असल्याचा आपण सतत इन्कारच केला होता. भास्कर हे सुदैवी. तेव्हा स्वीस दूतावासात काम करणारे कवी हरिवंशराय बच्चन यांच्या मदतीने ते पाकिस्तानातून सुटून तरी आले. पण नंतर त्यांना त्यांच्या थकलेल्या वेतनासाठी सरकारी कार्यालयांत जोडे झिजवावे लागले. भूषण हे हेर असोत वा नसोत, पाकिस्तान त्यांना हेर मानत आहे. तेव्हा त्यांच्या सुटकेसाठी परराष्ट्र खात्याने सर्व मुत्सद्देगिरी पणाला लावण्याची आवश्यकता आहे. नुसत्या घोषणांपेक्षा अशा प्रयत्नांत अधिक देशप्रेम असते हे लक्षात घ्यायला हवे. 
(लोकसत्ता, २७ मार्च २०१६)