‘मोल हंटर’ आणि सुटलेली शिकार

डिफेन्स कॉलनी, दिल्ली

दिल्लीतील डिफेन्स कॉलनी. माजी लष्करी अधिकाऱ्यांची वसाहत. दिल्लीच्या मध्यावर असूनही शांत-निवांत. मुबलक वृक्षराजी. त्या आड लपलेले उच्चभ्रू बंगले. 

रात्रीचा तिसरा प्रहर सुरु होत होता. एप्रिलमधील काहिलीने संत्रस्त झालेल्या त्या वसाहतीवर आता कुठे पहाटेचा गारवा पसरू लागला होता. तो पांघरून अवघी वसाहत शांत झोपली होती. 

झोपला नव्हता तो रॉचा वॉचर’. 

रॉ. रिसर्च अँड ॲनालिसीस विंग. नावात संशोधन आणि विश्लेषण असे एखाद्या वैज्ञानिक संस्थेला शोभावेत असे शब्द असलेतरी ही आहे भारताची विदेशात हेरगिरी करणारी संस्था. 

गेल्या जानेवारीपासून तिची डिफेन्स कॉलनीतील एका बंगल्यावर पाळत होती. रॉच्या काऊंटर इंटेलिन्स अँड सिक्युरिटी युनिट’ - सीआयएस -ची वॉचर टीम’ तेथे दिवस-रात्र नजर ठेवून होती. हे वॉचर नेहमी दोन-दोनच्या जोडीने काम करीत असतात. मोठे अवघड असते त्यांचे काम. जेथे पाळत ठेवायची त्या परिसरात बेमालूमपणे मिसळून जायचे. संशयितालाच नव्हेतर आजुबाजूच्या कोणालाही संशय येऊ द्यायचा नाही. आणि संशयितावरची नजर जराही हटवायची नाही. या कामासाठी माणसाच्या अंगात कमालीची सहनशीलता हवीसंयम हवा. अडचणींचा बाऊ न करता त्यांवर मात करण्याची वृत्ती हवी. संशयिताचे पुढचे पाऊल काय असेलतो कोणती खेळी खेळू शकेल याचा अंदाज लावण्याची बौद्धिक क्षमता हवी आणि त्याने समजा अचानक एखादी अनपेक्षित कृती केलीचतर त्यानुसार आपली चाल बदलण्याची लवचिकताही हवी. अशा पाळत्यांच्या जोड्या आजवर आळीपाळीने त्या बंगल्यावर नजर ठेवून होत्या. आता मात्र ती पाळत कमी करण्यात आली होती. त्या रात्री तेथे एकच वॉचर नेमलेला होता.

माजी लष्करी अधिकाऱ्यांच्या त्या वसाहतीत त्याचे काम अधिकच अवघड झालेले होते. सगळीकडे बंगले. मधून जाणारे छोटे रस्ते. त्यात कोणाच्याही नजरेत येणार नाही अशा प्रकारे लपणे कठीणच. दूरवर उभ्या केलेल्या कारमध्ये लपून तो बंगल्यावर लक्ष ठेवून होता. 

रात्री दोनच्या सुमारास त्या बंगल्यासमोरून एक टॅक्सी गेली. बसतेवढीच हालचाल. वॉचरने पाहिलेतो बंगला तसाच शांत होता

पण त्या शांततेच्या पोटात केवढे मोठे वादळ लपलेले होतेत्या वादळाने रॉची मुळेही कशी गदागदा हलणार आहेतयाचा त्या वॉचरला पत्ताही नव्हता. तो लागलातेव्हा फारच उशीर झाला होता. जिच्यासाठी त्या बंगल्यावर पाळत ठेवण्यात येत होतीती व्यक्ती तेथून रात्रीच पसार झाली होती. साधी असामी नव्हती ती. ती होती रॉची - रिसर्स अँड ॲनालिसिस विंगची - संयुक्त सचिव. रॉच्या साऊथ ईस्ट एशियन अफेअर्स ऑफिसची प्रमुख.  तिचे नाव रबिंदरसिंग. 

रबिंदरसिंगसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे अशा प्रकारे गायब होणे हा अमर भूषण यांच्यासाठी मोठाच धक्का होता

 

०००

अमर भूषण. 

रॉच्या काऊंटर इंटेलिजन्स अँड सिक्युरिटी युनिटचे - सीआयएसचे - प्रमुख. १९६७च्या आयपीएस बॅचचे ते अधिकारी. रॉचे तत्कालिन प्रमुख सी. डी. सहाय यांचे ते सहपाठी. तसे एकाच रँकचे ते अधिकारी. पण मार्च २००३ मध्ये सहाय यांची रॉच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आणि भूषण यांच्याकडे सोपविण्यात आली सीआयएसची जबाबदारी. गुप्तहेरांच्या परिभाषेत सीआयएस म्हणजे मोल हंटर्स. अतिशय समर्पक असा शब्द आहे. मोल म्हणजे चिचुंद्री. घरात बिळ करून राहणारी. असे म्हणतात की चिचुंद्री झोपलेल्या माणसाचे पाय कुरतडते. तेही त्याच्या नकळत. जेथे कुरतडायचे तो भाग आपल्या दुर्गंधीयुक्त श्वासाने सुन्न करून टाकते ती आधी. हेरसंस्थांमधील मोलही असेच. त्यांची शिकार न केल्यास राष्ट्राची सुरक्षा कुरतडून टाकतात ते. रबिंद्रसिंग हा त्याचा एक ताजा नमुना. रॉच्या आजवरच्या इतिहासातील सर्वांत मोठा डबल-एजंट. कौटिल्याने ज्याला उभयवेतन हेर असे म्हटले आहे असा सर्वात घातकी फितूर.

रबिंदरसिंग

असे राष्ट्रद्रोही फितूर तसे काही वेगळे नसतात. चारचौघांसारखेच असतात ते. रबिंदरसिंग हा अमृतसरच्या एका गब्बर जाट कुटुंबात जन्मलेला. मुळात गुरखा रायफल्समधला मेजर तो. १९८४ मध्ये अमृतसरच्या सुवर्णमंदिरात लपलेल्या खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात लष्कराने केलेल्या ऑपरेशन ब्लूस्टारमध्ये भाग घेतला होता त्याने. नंतर स्वच्छेने तो रॉमध्ये दाखल झाला. उच्चभ्रू श्रीमंत घरात वाढलेला. लष्करी शिस्तीत तयार झालेलायेता जाता धर्मग्रंथातील दाखले देणारा असा तो अधिकारी. पण पैशाचा मोठा लोभी. विदेशी गुप्तचर संस्थांच्या नजरेत तो आला नसता तर नवलच. हे असे अधिकारी हेरायचेत्यांना जाळ्यात ओढायचे आणि त्यांच्यामार्फत शत्रू वा मित्र राष्ट्राची गोपनिय माहिती मिळवायची हे प्रकार सगळ्याच हेरसंस्था करीत असतात. त्याचीही एक मोडस ऑपरेंडी - कार्यपद्धती - ठरलेली आहे. तीन प्रमुख तंत्रे आहेत त्याची. 

एक म्हणजे हनी ट्रॅप. सुंदर तरुणींचा वापर करून भुलवायचे. त्या तरुणीने त्या व्यक्तीच्या मनात विष पेरायचे किंवा मग त्या तरुणीबरोबरची नको त्या अवस्थेतील छायाचित्रे व चित्रफिती काढायची. त्यांद्वारे त्या व्यक्तीला बदनामी भिती दाखवून ब्लॅकमेल करायचे आणि त्याच्याकडून हवे ते काम करून घ्यायचे असे हे तंत्र. दुसरे तंत्र मनी ट्रॅपचे. हा सरळ सरळ व्यवहार. पैसे देऊन वा अन्य गरजा भागवून फितुरी करायला लावायची. तिसरे तंत्र विचारभेदाचे. काही लोक एखाद्या विचारसरणीने भारावलेले असतात. त्यासाठी काहीही करायची त्यांची तयारी असते. अशा व्यक्तींना हळुहळू गळाला लावायचे आणि केवळ त्या विचारसरणीकरीता म्हणून त्यांना फितुरी करायला लावायची. रबिंदरसिंगला अडकवण्यात आले होते मनी ट्रॅपमध्ये. आणि तो सापळा लावला होता अमेरिकेच्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीने - सीआयएने.

अमर भूषण यांच्या नजरेस तो पहिल्यांदा आला जानेवारी २००४ मध्ये. पण त्याआधी किमान १७ वर्षे तो सीआयएसाठी काम करीत होता. १९८८ मध्ये सीरियातील दमास्कसमधील इंडियन मिशनमध्ये त्याची नियुक्ती करण्यात आली होती तेव्हाची ही गोष्ट. तेथे जगाला दाखविण्यासाठी त्याला पद देण्यात आले होते प्रथम सचिव असे. त्या १९८० ते १९९२ या काळात हरिश चंडोला हे भारतीय पत्रकारही दमास्कसमध्ये इंडियन एक्स्प्रेसचे प्रतिनिधी म्हणून काम करीत होते. काही ब्रिटिश माध्यमांसाठीही लिहायचे ते. इंडिया मिशनमध्ये पत्रकार या नात्याने त्यांचे नेहमी जाणे-येणे असे. त्यांची आणि रबिंदरसिंग याची तोंडओळख तेथेच झालेली. 

एकदा तेथील एका पंचतारांकित हॉटेलात राजनैतिक अधिकाऱ्यांची कॉकटेल पार्टी होती. विविध दूतावासांतील अधिकारी जमले होते. हरिश चंडोलाही गेले होते त्या पार्टीला. त्यांच्या परिचयाचे एक अमेरिकी राजनैतिक अधिकारी भेटले त्यांना तेथे. छान गप्पागोष्टी चालल्या होत्या त्यांच्या. बोलता बोलता त्या अधिकाऱ्याने चंडोला यांना विचारले, ‘घुटामध्ये सीरियाची धावपट्टी असल्याचं तुम्हाला काही माहित आहे?’ घुटा हा दमास्कसला खेटून असलेला भाग. तेथे सीरियाने गोपनीयरित्या ती धावपट्टी उभारली होती.

चंडोला यांना त्या प्रश्नाचे जरा आश्चर्य वाटले. त्यांनी उलटे विचारले, ‘तुम्हाला कसं समजलं की तिथं धावपट्टी आहे?’ त्यावर तो अधिकारी उत्तरला, ‘तुमच्याच एका राजनैतिक अधिकाऱ्यानेरबिंदरसिंगने सांगितलं.’ रबिंदरसिंग हा रॉचा अधिकारी आहे हे बहुधा त्या अमेरिकी अधिकाऱ्याला माहित नसावं.

पण त्याला ते कसं समजलं?’

तो अधिकारी म्हणाला, ’सीरियन अधिकाऱ्यांनी त्याला त्या धावपट्टीवरून तर उत्तरेकडच्या हवाईतळाकडं नेलं होतं.

चंडोला यांच्यासाठी ही माहिती धक्कादायक होती. भारतीय हवाई दलाचे एक पथक भारतात आल्याचे त्यांना माहित होते. पण ते काही वाजत-गाजत आलेले नव्हते. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या कामासाठी ते तेथे आले होते. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सोव्हिएत बनावटीची मिग-२१२३ आणि २७ जातीची विमाने होते. या विमानांना विशिष्ट प्रकारचे पारदर्शक छत असते वैमानिक बसतो त्या जागेवर. कॅनोपी म्हणतात त्याला. हवाई दलाला त्यांची आवश्यकता होती. सोव्हिएत रशियाकडे ती उपलब्ध नव्हती. त्यामुळे भारताने अन्यत्र त्यांचा शोध सुरू केला होता. रशिया आणि सीरियाचे जवळचे संबंध. सीरियाला रशियाकडून मोठ्या प्रमाणावर लष्करी सामग्री दिली जात असे. त्यामुळे त्यांच्याकडे जादा कॅनोपी आहेत का हे पाहण्यासाठी हवाई दलाचे हे पथक दमास्कसला आले होते. त्यांच्या सोबतीला रॉचा अधिकारी म्हणून रबिंदरसिंग याचीही नेमणूक करण्यात आली होती. सीरियन वायुसेनेने त्या पथकाला उत्तरेकडील तळाकडे नेले होते आणि त्यासाठी दमास्कसबाहेरच्या त्या गोपनीय धावपट्टीचा वापर करण्यात आला होता. आता ही संवेदनशील माहिती रबिंदरसिंग यांनी त्या अमेरिकी अधिकाऱ्याला देण्याचे काहीच कारण नव्हते. चंडोला यांना जरा विचित्र वाटले ते. 

रमेश मुळ्ये हे तेव्हा भारताचे सीरियातील राजदूत होते. चंडोला यांनी थेट त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यानंतर काही दिवसांतच रबिंदरसिंग याला माघारी बोलावण्यात आले. कारवाई मात्र काही झाली नाही. पण यातून एक गोष्ट स्पष्ट होते की तो तेव्हाही अमेरिकेसाठी काम करीत होता. कदाचित तेथेच सीआयएने त्याला सापळ्यात पकडले असावे. 

दमास्कसमध्ये एका कार अपघातात त्याची मुलगी जखमी झाली होती. तिच्यावर तेथील रुग्णालयांत उपचार करण्याऐवजी तिला अमेरिकेत न्यावे अशी त्याची इच्छा होती. पण त्यासाठी भारत सरकार कसे पैसे देणारतरीही त्याने आपल्या मुलीला अमेरिकेत नेले. तिच्यावर तेथील महागड्या रुग्णालयात उपचार केले. त्याची बहिण तेव्हा जागतिक बँकेत काम करीत होती. तिने  तो सारा खर्च केला असे तो सांगायचा. पुढे बऱ्याच वर्षांनी हे उघड झाले की त्याच्या मुलीला दमास्कसमधून हलविण्यासाठी साह्य करणारी व्यक्ती म्हणजे रबिंदरसिंगची बहिण नव्हतीतर सीआयएच्या दमास्कस स्टेशनचा प्रमुख होता. 

भारतात परतल्यानंतरही त्याने आपल्या या विदेशी मालकांची चाकरी सोडली नाही. येथेही त्याने सीआयएसाठी हेरगिरी सुरूच ठेवली. ११ आणि १३ मे १९९८ रोजी वाजपेयी सरकारने केलेल्या पोखरण अणुस्फोट चाचणीने सीआयएला चांगलाच धक्का बसला होता. दक्षिण आशियातील सीआयएच्या मर्यादा तिने स्पष्ट केल्या होत्या. अशा काळात रबिंदरसारखा थेट रॉच्या कार्यालयातच बसणारा अधिकारी त्यांच्यासाठी महत्त्वाचा होता. त्याच्यावर डॉलरचा पाऊस पाडण्यात येत होता. पण सीआयएला केवळ त्याच्या डेस्कवरून येणाऱ्या गुप्तवार्ताच नको होत्या. त्यांना इतरही विभागातील गुप्तवार्तात्यांचे विश्लेषणात्मक अहवालत्यांच्या ऑपरेशन्सची माहिती हे सारे हवे होते. पण ते मिळवायचे कसे

रबिंदरसिंग याने त्यासाठी त्याची एक खास पद्धत तयार केली. मद्य आणि मदनिका ही अस्त्रे वापरण्याचे ठरविले. रॉमधील आपल्या कामाच्या व्यक्ती तो हेरायचा. त्यांच्याशी संबंध वाढवायचा. कधी आपल्या बंगल्याततर कधी उंची हॉटेलांत त्यांच्यासाठी पार्ट्या ठेवायचा. दणकून खाऊ-पिऊ घालायचा त्यांना. घरच्या आणि हॉटेलांतल्या पार्ट्यांमध्ये एकच फरक असायचा. तो म्हणजे हॉटेलांतील पार्ट्यांमध्ये सहसा पंचविशीच्या खालच्याच तरुणी उपस्थित असायच्या. ही अशी मौजमजा रॉमधील अनेकांसाठी दुर्मीळच. त्यामुळे लोक वाट पाहायचे रबिंदरसिंगच्या निमंत्रणाचे. त्या अधिकाऱ्यांशी अशा प्रकारे दोस्ताना प्रस्थापित केल्यानंतर मग तो त्यांच्याकडून सहज पाहण्यासाठी म्हणून फाईली घ्यायचा. गुपचूप त्यांच्या छायाप्रती काढायचा. त्यासाठी त्याने स्वतःच्या केबिनमध्ये स्वतंत्र फोटोकॉपी यंत्र बसविले होते. रॉच्या नियमांनुसार तेथील कोणत्याही कर्मचाऱ्याला रॉचा एक कागदसुद्धा घरी नेता येत नाही. असे नियम सहसा मोडलेच जातात. अनेक अधिकारी फाईलींचा निपटारा करण्यासाठी त्या घरी नेत असत. रबिंदरसिंगही ती कागदपत्रे घरी न्यायचा. सीआयएला त्यांच्या प्रती दिल्यानंतर तो ती नष्ट करीत असे. त्याकरीता घरात त्याने खास श्रेडर’ - कागदाचे बारीक तुकडे करणारे यंत्रही - बसविले होते. अशा प्रकारे शेकडो कागदपत्रे आणि फाईली त्याने हस्तगत केल्या होत्या. देशाचे एवढे नुकसान अन्य कोणत्या फितुराने केले नसेल.

त्याचे हे छायाप्रती काढण्याचे प्रमाण वाढतच चालले होते. विविध विभागांतल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून खोदून खोदून माहिती काढणेही त्याने सुरू केले होते. एस. चंद्रशेखर नावाचे एक अधिकारी तेव्हा रॉच्या मुख्यालयातच काम करीत होते. रबिंदरसिंगने त्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु केले होते. चंद्रशेखर (बहुधा) रॉच्या सायबर विभागात काम करीत होते. त्यांच्याकडून त्या विभागाशी संबंधित असलेली संवेदनशील माहिती काढून घेण्याचा प्रयत्न रबिंदरसिंगने चालवला होता. त्याची ही ज्ञानपिपासा’ पाहून चंद्रशेखर यांना त्याचा संशय आला. त्यांनी मग थेटच अमर भूषण यांची भेट घेतली आणि त्यांना स्पष्टपणे सांगितलेकी हा अधिकारी एखाद्या विदेशी गुप्तचरसंस्थेसाठी काम करीत असावा. तो महिना होता जानेवारी२००४. अमर भूषण यांच्याकडे मोल हंटर्सची जबाबदारी येऊन पुरते वर्षही झाले नव्हतेतोच त्यांच्यासमोर हे प्रकरण आले होते. 

पण तो केवळ संशय होता. रबिंदरसिंग हा खरोखरच डबल एजंट असेल काकी केवळ विकृत औत्सुक्याने तो नको ती माहिती गोळा करीत असेलपण त्या संशयाचे निराकरण करून घेणे आवश्यक होते. भूषण यांनी त्याचवेळी ठरवलेकी या प्रकरणाच्या अगदी मुळापर्यंत जायचे. पण त्यावेळी त्यांना हा अंदाज नव्हताकी येथील राजकीय व्यवस्थेतील काही जण सत्तेच्या मोहाने एवढे आंधळे झालेले होतेकी त्यापुढे त्यांना अशा फितुरांचीही पर्वा नव्हती. या शक्ती थेट पंतप्रधानांच्या कार्यालयात - वाजपेयींच्या पीएमओत - बसलेल्या होत्या. भूषण यांचा अंतिम संघर्ष होणार होता तो त्यांच्याशी.

 

०००

 

या प्रकरणाच्या तपासात पहिला अडथळा होता तो रबिंदरसिंग याच्या पदाचा. काहीही झाले तरी तो रॉचा संयुक्त सचिव होता. अशा अधिकाऱ्याला कुणाच्याही नकळत ताब्यात घेऊन त्याची चौकशी करावी की त्याच्यावर पाळत ठेवून अधिक पुरावे गोळा करायचे याचा सुरुवातीला निर्णयच होत नव्हता. रबिंदरसिंग याला केवळ चौकशीसाठी बोलावले असतेतरी ती माहिती काही लपून राहिली नसती. अगदी रॉचे कार्यालय झालेतरी तेथे ऑफिस गॉसिप चालतेच. त्यातून रबिंदरसिंग याचे अन्य कोणी साथीदार असतील तर ते सावध झाले असते. त्याचा हँडलर सावध झाला असता. 

गुप्तचरसंस्थांची एक कार्यपद्धती असते. प्रत्येक डबल एजंट म्हणजे फितूर झालेला गुप्तचर वा सोर्स म्हणजे गुप्तमाहिती चोरून पुरवणारी व्यक्ती यांच्यासाठी एक विशिष्ट अधिकारी तिचा हँडलर म्हणून नेमला जात असतो. त्यांच्याशी केवळ तोच संबंध ठेवून असतो. व्यवहार गद्दारीचाफितुरीचादेशद्रोहाचा असलातरी तेथेही विश्वास महत्त्वाचा असतो. त्यामुळेच हँडलर आणि डबल एजंट वा सोर्स यांच्यातील विश्वासाच्या नात्यावर नेहमीच भर दिला जातो. तसे नाते प्रयत्नपूर्वक निर्माण केले जाते. या सगळ्याची एक विशिष्ट मोडस ऑपरेंडी - कार्यपद्धती - असते. विशिष्ट नियमांनीच ते काम चालते. सर्वांत प्रथम म्हणजे यात तो डबल एजंट वा सोर्स कोण आहे याबद्दल कमालीची गुप्तता बाळगली जाते. आपल्या हेरसंस्थेतही मोजक्याच वरिष्ठांना - तेही नीड टू नो बेसिसवर (गरज असेल त्यांनाच आणि तेवढ्यापुरतीच) - माहिती दिली जाते. त्या डबल एजंटला अर्थातच कोड नेम - सांकेतिक नाव - दिले जाते. त्याबाबतच्या रिपोर्टमध्येही त्याचा उल्लेख सांकेतिक नावानेच केला जातो.

अशा या फितुराशी पहिल्यांदा ज्याने संपर्क साधलाएखाद्या व्यक्तीला फितुरी करण्यासाठी पहिल्यांदा ज्या गुप्तचराने तयार केलेतोच सहसा त्याचा हँडलर म्हणून काम करतो. त्या डबल एजंट वा सोर्सला सांभाळणेआपणांस हवी ती गोपनीय माहिती त्याच्याकडून हस्तगत करणे आणि त्या बदल्यात त्याला पैसे वा अन्य गोष्टी पुरवणे आणि पुन्हा आपला तो सोर्स वा डबल एजंट आपल्यावरच उलटू नये याची काळजी घेणे हे हँडलरचे काम. 

रबिंदरसिंगचा हँडलर कोण आहे हे समजणे महत्त्वाचे होते. त्यातून रबिंदरसिंग नेमक्या कोणत्या हेरसंस्थेसाठीदेशासाठी काम करत होताते समजले असते. आणि त्यामुळेच अमर भूषण यांचे म्हणणे होतेकी रबिंदरसिंगवर पाळत ठेवावी. ते आपल्या वरिष्ठांना पटवून देण्यासाठीही त्यांना झगडावे लागले. पण अखेर जानेवारी २००४ पासून त्याच्यावर सर्वव्यापी पाळत ठेवण्यात येऊ लागली.

आता रबिंदरसिंगचे सगळे लँडलाईन आणि मोबाईल फोन टॅप करण्यात येऊ लागले. त्याच्या केबिनमध्ये आणि घरात बगिंग डिव्हाईस’ - गुप्तपणे ध्वनि आणि चलत् चित्रे टिपून पाठवणारी उपकरणे - बसविण्यात आली. त्याच्या केबिनमध्ये डिजिटल फोटोकॉपिअर’ बसविण्यात आले. आता तो ज्या कागदपत्रांच्या छायाप्रती काढत होतात्यांच्या प्रती आपोआप त्या यंत्रात साठविल्या जात होत्या. त्यामुळे तो कोणती कागदपत्रे त्याच्या हँडलरला पुरवत आहे हे समजत होते. याशिवाय  त्याच्यामागे २० जणांची वॉचर टीमही लावण्यात आली. 

या सगळ्यातून मिळालेली माहिती प्रचंड धक्कादायक होती. तो सीआयएसाठी काम करीत होता हे तर त्यातून स्पष्ट झालेच होतेपण त्याला रॉमधील काही अधिकारीही सामील होते हेही त्यातून उघड झाले होते. त्याची पत्नी परमिंदर कौर हीसुद्धा त्याच्या या देशद्रोही कारवायांची भागीदार असल्याचेही रॉच्या मोल हंटरना दिसून आले होते. आता त्याच्याभोवतीचा फास आवळत चालला होता. कोणत्याही क्षणी त्याला अटक करणे आता शक्य होते. पण त्याचा दिल्लीतीलहँडलर’ कोण होता हे अजून समजले नव्हते. अमर भूषण यांना प्रतीक्षा होती ती तो सापडण्याची. रंगेहाथ पकडायचे होते त्यांना त्याला. पण

 

000

 

रबिंदरसिंगवर पाळत सुरु झाल्याचा तो ८५ वा दिवस होता. सायंकाळी चारचा सुमार. रॉच्या प्रमुखांनी भूषण यांना पाचारण केले होते. त्या बैठकीत रॉ प्रमुखांनी थेटच विषयाला हात घातला. 

तो हँडलर कोण आहे याचा पत्ता लागेल असं काही मिळालंय का तुम्हाला?’ 

नाही,’ भूषण म्हणाले, ‘त्याचा शोध एवढ्यात लागेल असं काही वाटत नाही.’ 

त्यावर रॉ प्रमुखांनी त्यांना स्पष्टच सांगितले, ‘असं असेल तर मग हे ऑपरेशन बंद करा.

हा भूषण यांच्यासाठी धक्काच होता. रॉ प्रमुख बोलत होते, ‘तसंही प्रिन्सिपल सेक्रेटरीना वाटतंयकी हे प्रकरण वाईट पद्धतीने हाताळलं जातंय. त्याचं महत्त्व प्रमाणापेक्षा जास्त फुगवलं जातंय.

ब्रजेश मिश्र आणि अटलबिहारी वाजपेयी


हे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणजे ब्रजेश मिश्र. मोठीचा आसामी होती ती. एक तर ते अटलबिहारी वाजपेयी यांचे खास मित्र होते. म्हणजे असे सांगतातकी पक्षातील कंपूशाहीच्या राजकारणाचा वीट आला की वाजपेयी सरळ न्यू यॉर्कला ब्रजेश मिश्र यांच्याकडे निघून जायचे. त्यांचे हे मैत्र इतकेकी पुढे वाजपेयींनी मिश्र यांच्याकडे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदाची जबाबदारीही सोपविली. पंतप्रधान कार्यालयाचे - पीएमओचे - प्रमुख ते होतेच. असा हा अधिकारी जेव्हा या प्रकरणात फारसा दम नाहीअसे सांगतो तेव्हा त्यातून खालच्या अधिकाऱ्यांनी योग्य तो बोध घ्यायचा असतोहे दिल्लीतील   जवळून पाहात असलेल्या भूषण यांना अन्य कोणी सांगायची आवश्यकता नव्हती. 

मिश्र यांचे म्हणणे असे होतेकी रबिंदरसिंग हा अशा नसत्या चौकशा करीत हिंडतो. त्याच्या अधिकारकक्षेत येत नसलेल्या अधिकाऱ्यांकडून माहिती उकरून काढण्याचा प्रयत्न करतो. हे सारे समजल्यानंतर त्याच्यावर कारवाई करायला हवी होती प्रशासकीय नियमांनुसार. म्हणजे मिश्र यांच्या दृष्टीने हे साधे कार्यालयीन शिस्तभंगाचे प्रकरण होते तर. 

याच दरम्यान त्यांनी रॉ प्रमुखांच्या मार्फत भूषण यांच्याकडे रबिंदरसिंग याच्या दूरध्वनी संभाषणाच्या प्रतिलिपी मागविल्या. त्या वाचून ते ठरविणार होते की या प्रकरणात किती दम आहे ते. मिश्र हे राजनैतिक अधिकारी. या क्षेत्रात त्यांच्या नावाचा बराच दबदबा होता. आंतरराष्ट्रीय घडामोडींतील तज्ञ मानले जात ते. पण गुप्तचरांचे कामकाज हे त्याहून भिन्न असते. त्यांनी त्या दूरध्वनी संभाषणाच्या फायली पाहाव्यात आणि त्यावरून आपले मत बनवावे आणि त्यानुसार आदेश द्यावेत हे काही भूषण यांच्यासारख्या मुरलेल्या गुप्तचर अधिकाऱ्याला मानवणारे नव्हते. त्यांनी रॉ प्रमुखांकडे आपली नाराजी व्यक्त केली. परंतु मिश्र यांच्या अधिकारापुढे त्या नाराजीची काय पत्रासदूरध्वनी संभाषणाच्या त्या फायली आणि वॉचर्सचे अहवाल मिश्र यांच्याकडे पाठविण्याचा आदेश रॉ प्रमुखांनी दिला. भूषण यांना तो मानण्याखेरीज अन्य पर्यायही नव्हता. 

ब्रजेश मिश्र यांना हे प्रकरण का दडपायचे आहे याचा अंदाज भूषण यांना हळुहळू येत चालला होता. त्यामागे कोणत्या प्रकारचे राजकारण आहे हे त्यांना कळून चुकले होते. साधी बाब होती. ब्रजेश मिश्र यांच्याविरोधात दिल्लीतील राजकारण्यांचा आणि अधिकाऱ्यांचा एक गट कार्यरत झालेला होता. मिश्र यांना हटविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली होती. त्यातच लोकसभेची निवडणूक तोंडावर आली होती. सगळीकडे इंडिया शायनिंग’ सुरू होते. अशात हे प्रकरण जगजाहीर झाले तर विरोधकांना आयतेच हत्यार मिळाले असते. वाजपेयींवर दबाव आणून त्यांनी मिश्र यांना घालविलेच असते. ते मिश्र यांना टाळायचे होते. त्यामुळे होता होईल तो हे प्रकरण झाकून ठेवण्याकडे त्यांचा कल होता. दुसरी गोष्ट म्हणजे यातून अमेरिकेशी असलेले संबंध बिघडण्याची शक्यता आहे असे त्यांना वाटत होते. लवकरच ते परराष्ट्र धोरणासंबंधीच्या कॅबिनेट समितीसमोर भारत-अमेरिका द्वीपक्षीय संबंधांबाबतचे सादरीकरण करणार होते. त्यावर या फितुरी प्रकरणाचा वाईट परिणाम झाला असता. ते त्यांना होऊ द्यायचे नव्हते. 

यात भूषण यांची मात्र गळचेपी होऊ लागली होती. आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी आणि हेरगिरी या दोन एकमेकांना पूरक असलेल्या गोष्टी. त्या ज्या प्रमाणे एकमेकांचा पर्याय बनू शकत नाहीतत्याच प्रमाणे एकीसाठी दुसरीचा बळीही देता येत नसतो. मिश्र नेमके हेच करू पाहात होते. अमेरिका दुखावली जाईल या भयाने ते हेरगिरी ऑपरेशनचा जीव घोटण्यास निघाले होते. या प्रकरणाबद्दल ज्या ज्या जाणकारांनी नंतर लिहिले आहेत्यांनी त्यांनी याबाबत मिश्र यांना दोष दिलेला आहे. रबिंदरसिंगला अटक करण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी अखेरपर्यंत दिलेच नाहीत. उलटभूषण यांच्या म्हणण्यानुसाररबिंदरसिंग यांच्यावरची पाळत पूर्णतः हटवा असे मिश्र यांनी रॉ प्रमुखांना सांगितले. 

तो आदेश ऐकून भूषण चिडलेवैतागलेसंतापले. रॉच्या प्रमुखांशी त्यांचे तसे बरोबरीचे नाते होते. त्यांच्याशी वाद घातला त्यांनी.

चिडलेल्या मनस्थितीतच भूषण आपल्या केबिनमध्ये आले. आपल्या सहकाऱ्यांना त्यांनी ही सारी माहिती दिली. ऑपरेशन रबिंदरसिंग गुंडाळायचे हे ऐकून सगळेच अवाक् झाले. अखेर प्रश्न राष्ट्राच्या सुरक्षेशी संबंधित होता. त्या आड राजकारण येता कामा नये असे त्यांना वाटत होते. 

बोलता बोलता भूषण यांनी मनाशी एक निश्चय केला. आपल्या सहकाऱ्याला ते म्हणाले, ‘देशद्रोहाच्या प्रकरणात आपण राजकारण येऊ देता कामा नये. त्यामुळे रॉ प्रमुखांचे याबाबतचे आदेश पाळायचे नाहीत असं मी ठरवलंय. त्यांना वाटलंतर ते मला या पदावरून हटवून त्यांना हवं तसं करू शकतात. त्यांनी तसं केलंतर मी मुकाटपणे ते ऐकेन. काहीही बोलणार नाही. पण आता मात्र त्यांचे आदेश पाळणार नाही.

माणसाच्या आयुष्यात कधी कधी असा प्रसंग येतोकी त्या वेळी आपल्या मनाशी प्रामाणिक राहूननैतिक भूमिका घेऊनपरिणामांची पर्वा न करता ठाम उभे राहायचे असते. लढायचे असते. अमर भूषण यांनी तशी भूमिका घेतली.

 

०००

 

रबिंदरसिंग याचा हँडलर कोण आहे हे अजून समोर आले नव्हते. ते समजले असतेतर लगेच त्याला अटक करता आली असती. पण रबिंदरसिंग याला अटक होणे हे रॉमधील काही अधिकाऱ्यांसाठीही अडचणीचे होते. रॉमधील किमान ५७ अधिकारीकर्मचारी रबिंदरसिंगच्या जाळ्यात अडकले होते. त्या सर्वांनी रबिंदरसिंगच्या पार्ट्यांमधील मीठ खाल्ले होते. त्यातील काही अजाणतातर काही जाणीवपूर्वक त्याला मदत करीत होते. त्यातीलच एक नाव होते एस. बी. तोमर यांचे. ते रॉचे सहसचिव. त्यांनी रबिंदरसिंगला सावध केले. अर्थात त्यांना याची कल्पना नव्हतीकी रबिंदरसिंगच्या केबिनमध्ये बसविलेल्या गुप्त कॅमेऱ्याने त्यांचे ते सारे संभाषण टिपले होते. 

तोमर यांनी ती टीप दिल्यानंतर रबिंदरसिंग भेदरला. आपल्याकडे संशयाची सुई वळलेली आहे याचा वास त्याला लागला होताच. या टीपनंतर तो अधिक सावध झाला. अस्वस्थ झाला. याचे आणखी एक कारण म्हणजे अमेरिकेत त्याच्या मुलीचा होणारा साखरपुडा. त्यासाठी त्याने रजेचा अर्ज दिला होता. पण ती रजा मंजूर केली जात नव्हती. आता भारतात राहणे म्हणजे संकट ओढवून घेणे हे त्याला कळून चुकले होते. तो देशातून पसार व्हायच्या तयारीला लागला होता. अशात एके दिवशी त्याचा कॅनडातील मेव्हणा भारतात आला. त्याच्याबरोबर नेपाळला फिरायला जायची योजना त्याने आखली.

रॉच्या कर्मचाऱ्यांना देशाबाहेर कुठेही जायचे असेलतर त्यासाठी वरिष्ठांची रितसर परवानगी घ्यावीच लागते. रॉचे अतिरिक्त सचिव संजीव (एस. के.) त्रिपाठी हे रबिंदरसिंगचे वरिष्ठ अधिकारी. त्यांच्याकडे त्याने नेपाळला जायची परवानगी मागितली. रबिंदरसिंग हा काय आहे हे माहित असूनही त्यांनी तशी परवानगी दिली. बहुधा त्यांनीही रबिंदरसिंगच्या पार्ट्यांतले मीठ चाखले होते. 

एव्हाना रबिंदरसिंगवरील पाळतीची तीव्रता कमी करण्यात आली होती. याचाच फायदा रबिंदरसिंगने उठवला. 

३० एप्रिल २००४च्या रात्री त्याने रॉच्या हातांवर तुरी दिली. त्या रात्री दोनच्या सुमारास त्याच्या बंगल्यासमोरून गेलेल्या त्या टॅक्सीमधून तो पत्नीसह पळाला. ती टॅक्सी आणली होती त्याच्या मेव्हण्याने. त्याने त्यांना भारत-नेपाळ सीमेवर सोडले. २ मे २००४ रोजी त्याने नेपाळमध्ये प्रवेश केला. नेपाळगंजमधील एका हॉटेलात ते नाव बदलून थांबले. तेथे अमेरिकेच्या काठमांडूतील दूतावासातील एक अधिकारी त्यांना भेटले. त्यांचे नाव डेव्हिड एम. व्हॅकाला. दूतावासातील प्रथम सचिव हे त्यांचे दाखवायचे पद. मुळात ते सीआयएचे गुप्तचर होते. 

असा संशय आहे की हे व्हॅकाला हेच रबिंदरसिंगचे हँडलर’ होते. दिल्लीत मात्र त्याच्याशी कोणी वेगळीच व्यक्ती संपर्क ठेवून असावी असा संशय आहे. अनेकदा तो अमेरिकी दूतावासातील अधिकाऱ्यांना भेटत असे. त्यावेळी ही देवाणघेवाण होत असावी. २००१ मध्ये रबिंदरसिंग याची नियुक्ती हेगमध्ये करण्यात आली होती. तेथील भारतीय दूतावासात प्रथम सचिव (कॉन्स्युलर) हे त्याचे पद होते. त्यावेळी अमेरिकी दूतावासातील द्वितिय सचिव वॉल्टर पी. मॉरिसन यांना तो अनधिकृतपणे भेटला होता आणि त्यावेळी त्याने मॉरिसन यांना नऊ अतिगोपनीय फाईली दिल्या होत्या अशी नोंद आहे. रबिंदरसिंग याचा एक नातेवाईकयूएसएड’ - ‘युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेन्ट’ - मध्ये काम करायचा. विकसनशील देशांना आर्थिक मदत करणेत्यांच्या विकासकामांत साह्य करणे हे या संस्थेचे काम. जॉन. एफ. केनेडी यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत तिची स्थापना झाली.  अनेक देशांत तिचे काम चालते. भारतातही. पण हे झाले या संस्थेचे एक रूप. तिचा दुसरा चेहरा आहे सीआयएच्या सहयोगी संस्थेचा. सीआयएच्या गुप्तचरांसाठी ही संस्था म्हणजे चांगलाच कव्हर’. तर युएसएडमध्ये काम करणारा रबिंदरसिंगचा तो नातेवाईक नेहमी भारतात येत असे. रबिंदरसिंगच्याच घरी उतरत असे. त्याच्या मार्फतही फायली पाठविल्या जात असाव्यात. पण १९९७ ते २००३ या काळात तरी व्हॅकाला हेच रबिंदरसिंगला थेट हँडलकरीत असावेत असे मानण्यास वाव आहे. या काळात ते भारतातच होते. मुंबईतील अमेरिकी कौन्स्युलेटमध्ये काम करीत असत तेव्हा ते. पुढे त्यांची वॉशिंग्टनमध्ये सीआयएच्या मुख्यालयात बदली झाली. मे २००३ पर्यंत ते तेथे होते. या काळात अफगाणिस्तानातील घडामोडींची जबाबदारी त्यांच्यावर होती. लवकरचम्हणजे जून २००३ मध्ये त्यांना काठमांडूला पाठविण्यात आले. तेथे रबिंदरसिंगचे सतत जाणे-येणे होते. आताही नेपाळगंजमध्ये त्यांची भेट झाली. दुसऱ्याच दिवशी ते तिघेही तेथून विमानाने काठमांडूला गेले. अमेरिकी दूतावासाच्या गेस्ट हाऊसमध्ये रबिंदरसिंग आणि परमिंदर कौर यांची व्यवस्था करण्यात आली होती. तब्बल चार दिवस होते ते तेथे. या अवधीत अमेरिकी अधिकाऱ्यांनी त्यांची बनावट कागदपत्रे तयार केली. रामप्रसाद शर्मा आणि दीपाकुमार शर्मा या नावाने त्यांना पासपोर्ट आणि व्हिसा देण्यात आला. आणि ७ एप्रिल २००४च्या रात्री ११ वाजता त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुटणाऱ्या ऑस्ट्रियन एअरलाइन्सच्या फ्लाइट ओएस-०३२ मध्ये त्यांना बसवून देण्यात आले. 

तोवर नवी दिल्लीतील गुप्तचर विश्वातपंतप्रधान कार्यालयात हलकल्लोळ माजला होता. रबिंदरसिंग पळाल्याचे समजताच त्याच्या नावाने लूकआऊट नोटीस’ काढण्यात आली. एका अधिकाऱ्याला आयबीला त्याची खबर देण्यास सांगण्यात आले. पण त्याच्याकडून ते राहून गेले. तो नेपाळमध्ये आहे हे समजलेतोवर बराच उशीर झाला होता. त्याच्या विमानाने अवकाशात झेप घेतलीत्याच्या दुसऱ्या दिवशी रॉच्या नेपाळमधील स्टेशनला त्याचा शोध घेण्यास सांगण्यात आले… या सगळ्यात दिसत होती ती अक्षम्य अकार्यक्षमता. किंवा मग कारस्थान. रबिंदरसिंगला पळवून लावण्याचे कारस्थान. 

तो पळून गेला ते देशाचे मोठे नुकसान करून. सीआयएच्या हाती मात्र गोपनीय माहितीचा खजिनाच दिला होता त्याने. काय नव्हते त्या खजिन्यात?अफगाणिस्तानमधील तालिबान-पाकिस्तानचे संबंधजम्मू-काश्मीरमधील आयएसआयच्या दहशतवादी कारवायांच्या योजनातेथील संरक्षणविषयक परिस्थितीभारतीय सीमेवरील चीनची घुसखोरीनेपाळमधील माओवाद्यांच्या कारवायाराष्ट्रकुल देशांतील अमेरिकेच्या कारवायाअमेरिकेची पाकिस्तानला मदतबांगलादेशातील राजकीय घडामोडीश्रीलंकेतील निवडणुका आणि त्यांचे भारतावरील परिणाम अशा अनेकविध बाबींचे अतिगोपनीय अहवालगुप्तवार्ता सीआयएच्या हाती आपसूक पडल्या होत्या. भारताचे आंतरराष्ट्रीय धोरण ठरविण्याकामी हे अहवाल मोलाचे असतात. ते सीआयएच्या हाती पडणे म्हणजे भारत आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणत्या भूमिका घेणार आहेहे आधीच त्यांना समजणे. हे देशहिताला मारकच. या अशा माहितीबरोबरच सीआयएची नजर होती ती भारताच्या अणुकार्यक्रमांवर. १९९८ मध्ये वाजपेयी सरकारने केलेल्या अणुचाचण्या ही सीआयएच्या गालावरची थप्पड ठरली होती. ते ऐतिहासिक अपयश धुवून काढणे ही सीआयएची गरज बनली होती. त्याकामी रबिंदरसिंगसारखा मोहरा त्यांच्या उपयोगास आला होता. रॉच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे विविध अणुकार्यक्रमांविषयीचे गोपनीय अहवाल तो सीआयएच्या हाती पिकल्या फळासारखे ठेवत होता. 

त्याला अटकेपासून वाचविण्यातअमेरिकेला पळून जाण्यात सीआयएने एवढी मदत का केली असा प्रश्न अनेकांना पडतो. आपल्या या अशा कृत्याने भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतोयाची सीआयएने काडीचीही पर्वा केली नव्हती. या मागे नेमके काय कारण असावे या प्रश्नाचे उत्तर कदाचित रबिंदरसिंगने सीआयएला आतापर्यंत दिलेल्या या अशा अनमोल सेवेत असावे. 

 

००० 

 

रबिंदरसिंगचे पसार होणे हे रॉच्या अंतर्गत हेरगिरीविरोधी पथकाचेमोल हंटर्सचे आणि त्यांचे प्रमुख अमर भूषण यांचे अपयशच. पण त्या अपयशाला कारणीभूत ठरला तो रॉबाह्य शक्तींचा रॉच्या कामकाजातील थेट हस्तक्षेप. रॉच्या तत्कालिन प्रमुखांनी त्या हस्तक्षेपापुढे झुकविलेली मान. त्याविरोधात भूषण यांनी वेळोवेळी लढा दिलाहे खरे. पण ते देशातील आणि देशाबाहेरील बड्या शक्तींसमोर दुबळे ठरले. ते दुबळेपण त्यांचे की रॉसारखी गुप्तचरसंस्था चालविणाऱ्या व्यवस्थेचे हा खरे तर प्रश्नच असू शकत नाही. रबिंदरसिंग प्रकरणात अडकलेल्यात्याला वेळोवेळी मदत करणाऱ्या त्या सर्वच्या सर्व ५७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर पुढे कारवाई न होणे यातच सगळे काही आले.

 

००००००

संदर्भ - 


टीप - रबिंदरसिंग यांच्या प्रकरणातील ब्रजेश मिश्र आणि रॉचे तत्कालिन प्रमुख सी. डी. सहाय यांच्या भूमिकेविषयीचा सर्व मजकूर अमर भूषण यांच्या पुस्तकातून घेतलेला आहे. गोपनियता कायद्याच्या दडपणामुळे भूषण यांना ते सारे स्पष्टपणे लिहिता येणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाला काल्पनिकतेचे रुपडे चढविले. पात्रांची नावे बदलली. परंतु घटना त्याच राहिल्या. त्या घटनांना आधार देणारी माहिती अन्य काही लेखांतूनपुस्तकांतून येते. त्या सगळ्याचा वापर या वृत्तकथेसाठी केला आहे. 

 

पूर्वप्रसिद्धी - ऋतुरंग दिवाळी अंक २०२०, संपादक - अरुण शेवते