‘मोल हंटर’ आणि सुटलेली शिकार

डिफेन्स कॉलनी, दिल्ली

दिल्लीतील डिफेन्स कॉलनी. माजी लष्करी अधिकाऱ्यांची वसाहत. दिल्लीच्या मध्यावर असूनही शांत-निवांत. मुबलक वृक्षराजी. त्या आड लपलेले उच्चभ्रू बंगले. 

रात्रीचा तिसरा प्रहर सुरु होत होता. एप्रिलमधील काहिलीने संत्रस्त झालेल्या त्या वसाहतीवर आता कुठे पहाटेचा गारवा पसरू लागला होता. तो पांघरून अवघी वसाहत शांत झोपली होती. 

झोपला नव्हता तो रॉचा वॉचर’. 

रॉ. रिसर्च अँड ॲनालिसीस विंग. नावात संशोधन आणि विश्लेषण असे एखाद्या वैज्ञानिक संस्थेला शोभावेत असे शब्द असलेतरी ही आहे भारताची विदेशात हेरगिरी करणारी संस्था. 

गेल्या जानेवारीपासून तिची डिफेन्स कॉलनीतील एका बंगल्यावर पाळत होती. रॉच्या काऊंटर इंटेलिन्स अँड सिक्युरिटी युनिट’ - सीआयएस -ची वॉचर टीम’ तेथे दिवस-रात्र नजर ठेवून होती. हे वॉचर नेहमी दोन-दोनच्या जोडीने काम करीत असतात. मोठे अवघड असते त्यांचे काम. जेथे पाळत ठेवायची त्या परिसरात बेमालूमपणे मिसळून जायचे. संशयितालाच नव्हेतर आजुबाजूच्या कोणालाही संशय येऊ द्यायचा नाही. आणि संशयितावरची नजर जराही हटवायची नाही. या कामासाठी माणसाच्या अंगात कमालीची सहनशीलता हवीसंयम हवा. अडचणींचा बाऊ न करता त्यांवर मात करण्याची वृत्ती हवी. संशयिताचे पुढचे पाऊल काय असेलतो कोणती खेळी खेळू शकेल याचा अंदाज लावण्याची बौद्धिक क्षमता हवी आणि त्याने समजा अचानक एखादी अनपेक्षित कृती केलीचतर त्यानुसार आपली चाल बदलण्याची लवचिकताही हवी. अशा पाळत्यांच्या जोड्या आजवर आळीपाळीने त्या बंगल्यावर नजर ठेवून होत्या. आता मात्र ती पाळत कमी करण्यात आली होती. त्या रात्री तेथे एकच वॉचर नेमलेला होता.

माजी लष्करी अधिकाऱ्यांच्या त्या वसाहतीत त्याचे काम अधिकच अवघड झालेले होते. सगळीकडे बंगले. मधून जाणारे छोटे रस्ते. त्यात कोणाच्याही नजरेत येणार नाही अशा प्रकारे लपणे कठीणच. दूरवर उभ्या केलेल्या कारमध्ये लपून तो बंगल्यावर लक्ष ठेवून होता.