रॉ फाइल


आपल्याकडच्या प्रत्येक दहशतवादी कारवाईमागे इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स (आयएसआय) या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा हात असतोअसे म्हणण्याची पद्धत आहे. तशीच रीत पाकिस्तानातही आहे. तेथील प्रत्येक दहशतवादी हल्ल्यामागे रिसर्च अँड अँनालिसिस विंग (रॉ)चा हात आहेअसे म्हटले जाते. तीन वर्षांमागे लाहोरमध्ये अहमदींवर भीषण हल्ला झाला होता. ८० लोक त्यात मारले गेले होते. तर पाकिस्तानमधील द नेशन या इंग्रजी दैनिकात पहिल्या पानावर ती हल्ल्याची बातमी होती आणि शेवटच्या पानावर पाकिस्तानात ३५ हजार रॉ एजंट कार्यरत अशा ठळक मथळ्याची सविस्तर बातमी होती. रॉच्या बाबतीत तिथे हे असे नेहमीच म्हटले जाते. कारण ते सोयीचे असते. कदाचित ते खरेही असेलपण त्याबद्दल कोण खात्रीपूर्वक सांगणार?

तर अशी ही रॉ. भारताची विदेशात हेरगिरी करणारी संस्था. १९६८ मध्ये तिची स्थापना झाली. भारतीय सुपरस्पाय म्हणून ओळखले जाणारे रामनाथ काव हे तिचे पहिले संचालक. या गुप्तचर संस्थेच्या नावावर आजवर अनेक उत्तम कामगि-यांची नोंद आहे. बांगलादेशची मुक्तीसिक्कीमचे सामिलीकरणसियाचेनवरील भारताचा ताबा ही त्यातली काही मोजकी उदाहरणं. एलटीटीईच्या अतिरेक्यांना प्रशिक्षणम्यानमारमधील कचिन इंडिपेन्डन्स आर्मीला मदत आणि नंतर त्या बंडखोर संघटनेचे काही नेते हाताबाहेर गेल्यानंतर त्यांच्या हत्या अशाही काही कामगि-या रॉच्या नावावर आहेत. पण सगळेच काही असे छान छान नाही. रॉ अनेक मोहिमांत तोंडावर आपटलेली आहे. अनेकदा रॉच्या एजंटांनी तिच्या तोंडाला काजळी फासलेली आहे. उदाहरणार्थ मेजर रबिंदर सिंग.


रबिंदरसिंग हा लष्करातला मेजर. निवृत्तीनंतर तो रॉमध्ये दाखल झाला. रॉच्या आग्नेय आशिया विभागाचा तो प्रमुख होता. पण तो गद्दार निघाला. रॉसाठी हेरगिरी करण्याऐवजी तो रॉमध्येच अमेरिकेच्या सीआयएसाठी हेरगिरी करू लागला. रॉमधील अधिका-यांच्या लक्षात ते आले. पण पुराव्यानिशी त्याला पकडण्याच्या आधीच५ जून २००४ रोजी तो गुपचूप भारत सोडून पळाला.

आपला एखादा गुप्तहेर गद्दार होणं ही गुप्तचर संस्थेसाठी तशी ओंजळभर पाण्यात बुडून मरण्यासारखीच गोष्ट. पण तो केवळ शरमेचा मामला नसतो. राष्ट्राचं कधीही भरून न येणारी हानी करण्याची क्षमता अशा घटनांमध्ये असू शकते. रामनाथ काव यांच्यासारख्या हेरगिरीतल्या भीष्मपितामहाचा वैयक्तिक सहायक सिकंदरलाल मलिक जेव्हा अमेरिकेत पोस्टिंगवर असताना अचानक गायब होतोतेव्हा भारताची किती गुपितं उघड झाली असतीलयाचा केवळ अंदाज लावणं एवढंच मागे राहात असतं. तेव्हा अशा प्रकारच्या घटना घडू नयेतआपले गुप्तचर शत्रू आणि मित्र राष्ट्रांच्या अमिषांना बळी पडू नयेत यासाठी सगळ्याच गुप्तचरसंस्था पुरेपूर काळजी घेत असतात. असे गद्दार कोणी निपजलेच तर त्यांना वेळीच पकडण्यासाठी खास यंत्रणा उभारत असतात. रॉमध्येही अशी यंत्रणा आहे. पण तरीही १९६८ पासून आजवर किमान नऊ जण गद्दार निघाले. रबिंदरसिंग हा त्यातला अखेरचा. मात्र बाकीच्या गुप्तचरांपेक्षा त्याचे प्रकरण जरासे वेगळे होते. बाकीचे जेव्हा पळून गेले,गायब झाले तेव्हाच त्यांच्या गद्दारीचा सुगावा लागला होता. रबिंदरसिंगचा वास मात्र आधीच लागला होता. तो रॉची गुपितं पळवित आहेहे आधीच समजलं होतं. त्याच्यावर पाळतही ठेवण्यात आली होती. पण तरीही रॉच्या हेरगिरीविरोधी विभागाच्या नाकावर टिच्चून तो नेपाळमार्गे अमेरिकेस पळून जाऊ शकला. तर हे नेमके कसे घडले? रबिंदरसिंग हा सीआयएसाठी काम करीत आहे हे समजल्यानंतरही त्याला पकडण्यात का आले नाही? रॉची हेरगिरीविरोधी यंत्रणा त्यात कमी पडली की तत्कालिन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांच्या हस्तक्षेपामुळे तसे घडले? अमर भूषण यांच्या एस्केप टू नोव्हेअर या कादंबरीमध्ये या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात.

अमर भूषण हे स्वतः रॉचे गुप्तचर होते. २००५ मध्ये ते स्पेशल सेक्रेटरी या पदावरून निवृत्त झाले. रबिंदर सिंग प्रकरण घडत असताना ते रॉच्या काऊंटर-इंटेलिजन्स विभागाचे प्रमुख होते. म्हणजे रबिंदर सिंगने तुरी दिल्या त्या अमर भूषण यांच्या हातावरच. तेव्हा येथे प्रथमदर्शनी असा संशय येण्यास जागा आहेकी ही कादंबरी (शासकीय गोपनीयताविषयक कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी  ही सत्यघटनेने प्रेरित काल्पनिक कादंबरी असल्याचे म्हटले आहे.) म्हणजे भूषण यांचा स्वसमर्थनाचास्वबचावाचा प्रयत्न आहे. पण तसे काही जाणवत नाहीहे विशेषच म्हणावयास हवे. रबिंदरसिंग (रवी मोहन हे कादंबरीतले त्याचे नाव) याच्याविषयी शंका येण्यापासून तो पळून जाण्यापर्यंतचा ९६ दिवसांचा घटनाक्रम येथे डायरी स्वरूपात देण्यात आलेला आहे. हे सगळं सर्वसामान्य वाचकांसाठी चकीत करणारं असलंतरी ही कादंबरी थरारकरोमांचक अशा पंथातली नाही. ती फोर्सिथ वा लडलम यांच्यापेक्षा ग्रॅहम ग्रीन यांच्या वळणाने जाते. त्यामुळे जेसन बोर्न किंवा एजंट विनोद वगैरेंच्या चाहत्यांनी या कांदबरीच्या वाटेला न गेलेले बरे. 

रॉ ही गुप्तचर संस्था चालते कशी यात ज्यांना रस आहेत्यांच्यासाठी मात्र ही कादंबरी म्हणजे अत्यावश्यक वाचन आहे. भूषण यांचा कादंबरी लेखनाचा हा पहिलाच प्रयत्न. पण त्यांचा या प्रकरणातील सहभाग आणि त्यांना असलेली रॉच्या कार्यप्रणालीची अंतर्बाह्य माहिती यामुळे या कादंबरीला एक वजन आलेले आहे आणि रॉचे हल्लीचे रुप जाणून घेण्याची इच्छा असलेल्यांना तेवढे अधिकाहून अधिक पुरेसे आहे. 

एस्केप टू नोव्हेअर
अमर भूषणकोणार्क पब्लिशर्सनवी दिल्लीपृ. ३३२,मूल्य २९९ रु.