हेरस्य कथा रम्यः

१३ मार्च १९५४ हा केजीबीचा जन्मदिवस. ६ नोव्हेंबर १९९१ हा "मृत्युदिन'. १९९१ च्या ऑगस्टमध्ये मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्याविरोधात झालेल्या बंडामध्ये केजीबीचे अध्यक्ष कर्नल व्लादिमिर क्रुश्‍कोव्ह यांनी सहभाग घेतला होता. त्याची शिक्षा म्हणून ही संघटनाच बरखास्त करण्यात आली. आज केजीबीचीच पडछाया असलेली "एफएसबीही संघटना रशियात कार्यरत आहे. 

केजीबीच्या बोलीमध्ये "अॅक्‍टिव्ह मेझर्सहा शब्द खूप महत्त्वाचा मानला जातो. त्याचा अर्थ सोव्हिएत रशियाच्या परराष्ट्र धोरणातील उद्दिष्टांची पूर्ती आणि जगभरात सोव्हिएत प्रभाव निर्माण करणे याकरिता केल्या जाणाऱ्या कारवाया. त्यात विदेशी प्रसारमाध्यमांना बनावट कागदपत्रं पुरवून अर्धसत्य वा चुकीची माहिती पुरवून गोंधळ निर्माण करणेसोव्हिएत रशियाचा राजकीय प्रभाव वाढविण्याच्या दृष्टीने विविध देशांमध्ये "बेनामीसंघटना स्थापन करणेदहशतवादी,बंडखोर संघटनांना मदत करणे इत्यादी कृत्यांचा समावेश होतो. पुन्हा अशा कारवाया केवळ शत्रूराष्ट्रातच करायच्या असं काही बंधन नसतं. त्या भारतासारख्या मित्रदेशामध्येही केल्या जात. "मित्रोखिन अर्काइव्ह'ने ते पुरेसं स्पष्ट केलं आहे.

व्हॅसिली मित्रोखिन यांची कथा सुरू होते ती साठच्या दशकात.
कायदा आणि इतिहासाचा विद्यार्थी असलेला हा गृहस्थ १९४८ मध्ये सैन्यातून "एमजीबी'या गुप्तहेर संघटनेत दाखल झाला. १९५६ पर्यंत त्यांनी विदेशातील विविध कारवायांमध्ये प्रत्यक्ष भाग घेतला. एक कारवाई फसली आणि त्याची शिक्षा म्हणून त्यांना केजीबीचं अर्काइव्ह सांभाळण्याच्या कामी नेमण्यात आलं. त्या कागदपत्रांनी त्यांना केजीबीचा खरा चेहरा दाखवला. त्यांचा भ्रमनिरास झाला. १९७२ ते १९८४ या काळात केजीबीच्या जुन्या इमारतीतून नव्या कार्यालयात ही कागदपत्रं हलविण्यात आली. मित्रोखिन यांनी ती संधी साधली. कार्यालयात सर्वांची नजर चुकवून ते या कागदपत्रांच्या प्रती तयार करायचे. बुटातकोटात लपवून त्या प्रती ते घरी न्यायचे. ही जीवावरचीच जोखीमपण बारा वर्षे त्यांनी ती पार पाडली. १९८५ मध्ये ते निवृत्त झाले. त्यानंतर १९९२ मध्ये लात्वियामधील रिगा शहरात पर्यटनासाठी म्हणून ते गेले. मोका साधून हळूच ते ब्रिटिश दुतावासात गेले. आपल्याकडील कागदपत्रांच्या बदल्यात राजकीय आश्रय द्यावाअशी त्यांची ऑफर होती. "एमआय-सिक्स' ने ती स्वीकारली. यानंतरचा इतिहास अतिशय धूसर आहे. आपणास एवढंच समजतंकी ब्रिटिश गुप्तहेरांनी मित्रोखिन यांच्यासह त्यांचं "अर्काइव्ह'आणि कुटुंबीय यांना अतिशय गुप्ततेने ब्रिटनमध्ये "स्मगल'केलं.

एका दृष्टीने ब्रिटनमध्ये येण्यास मित्रोखिन यांना तसा उशीरच झाला. कारण तोवर सोव्हिएत रशियाचं विघटन झालं होतं. शीतयुद्ध संपलेलं होतं. हेरॉल्ड फिल्बीगाय बर्गीसडोनाल्ड मॅक्‍लिन हे रशियाचे एजंट होतेहे ते मॉस्कोला पळून गेल्यानंतरच उघडकीस आलंत्यालाही बरीच वर्षे लोटली होती. ख्रिस्तिन किलर या "विषकन्ये'च्या गळाला ब्रिटनचे तत्कालिन युद्धमंत्री जॉन प्रोफ्युमो लागले होते. ही मदनिका केजीबीसाठी काम करीत होती. हे प्रकरणही मित्रोखिन येण्यापूर्वी २० वर्षे आधी घडलेलं. तेव्हा ब्रिटिश गुप्तहेर संघटनांची तोवर पुरती नाचक्की झाली होती. तरीही मित्रोखिन यांची कागदपत्रं अगदीच इतिहासाचा भाग ठरली नाहीत. त्या कागदपत्रांवरून रशियाला तब्बल ४० वर्षे अण्वस्त्रांची गुपितं पुरवणारी मेलिटा नॉरवूडसारखी हेर पकडली गेलीपण त्यालाही तसा उशीरच झाला होता. नॉरवूडचा पर्दाफाश झालातेव्हा तिचं वय होतं ८७ वर्षे. ऑस्ट्रेलियाला मात्र मित्रोखिन यांच्या माहितीचा मोठा फायदा झाल्याचं सांगण्यात येतं. केजीबीचं त्याने बरंच नुकसान झालं. त्यात गंमत एवढीच,की तोवर केजीबीचाच अंत झालेला होता.

या कागदपत्रांवरून हेरगिरीच्या इतिहासाचे तज्ज्ञ म्हणून नाणावलेले केंब्रिजमधील प्राध्यापक ख्रिस्तोफर अँड्य्रू यांनी "मित्रोखिन अर्काइव्ह'चे दोन खंड लिहिले. त्यातील पहिला "द सॉर्ड‌ अँड द शिल्ड' (२०००) या नावानेतर दुसरा "द केजीबी अँड द वर्ल्ड' (२००५) या शीर्षकाने प्रसिद्ध झाला. योगायोगाची गोष्ट म्हणजे बरोबर सहा वर्षांपूर्वी सप्टेंबर महिन्यातच लंडनच्या "टाइम्स'ने "द सॉर्ड अँड द शिल्ड'मधील प्रकरणे क्रमशः प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली होती आणि आज भारतात दुसऱ्या खंडाने जेवढी खळबळ उडाली आहेत्याहून किती तरी अधिक खळबळ ब्रिटनमध्ये उडाली होती. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस पक्षभारतीय कम्युनिस्ट पक्षतसेच काही पत्रकारांवर ज्याप्रमाणे आरोप करण्यात आलेले आहेततसेच आरोप ब्रिटनमधील लेबर पार्टी आणि "ट्रिब्यून'सारख्या वृत्तपत्रांवर त्या पुस्तकातून करण्यात आले होते. वर म्हटल्याप्रमाणे नॉरवूडतसेच लेबर पार्टीचे खासदार टॉम ड्रायबर्गफ्रान्स्वॉ मितरॉं यांचे निकटवर्ती असलेले फ्रेंच सोशालिस्ट पार्टीचे नेते क्‍लॉड एस्टिअर हे रशियाचे एजंट असल्याचं त्यातून उघडकीस आलंपण या पुस्तकातील सगळीच माहिती निर्विवाद सत्य होती असंही नाही. त्यादृष्टीने रिचर्ड गॉट यांचं प्रकरण पाहण्यासारखं आहे. मित्रोखिन अर्काइव्हनुसाररिचर्ड गॉट यांनी "गार्डियन'मध्ये एक लेख लिहिला होता. त्यात चिलीचे अध्यक्ष साल्वादोर आयंदे यांच्या हत्येत सीआयएचा हात असल्याची टीका होती. हा लेख केजीबीच्या सांगण्यावरूनच लिहिला असं मित्रोखिनची कागदपत्रं सांगतात. खरं तर गॉट यांची विचारसरणी पाहता अमेरिकन साम्राज्यवादावर टीका करण्यासाठी त्यांना मुळात केजीबीच्या प्रोत्साहनाची गरजच नव्हती! (ही त्या पुस्तकातलीच अँड्य्रू यांची टिपणी.) आता यातली मौज अशीकी असा लेख गॉट यांनी कधी लिहिलाच नव्हता! अर्थ स्पष्ट आहेमित्रोखिन अर्काइव्ह जरी खरं असलंतरी त्या माहितीचे स्रोत खरे असतीलच याची हमी नाही. अनेकदा गुप्तहेरांची माहिती सांगोवांगीवरही आधारीत असते. अमेरिकेने इराकप्रकरणी त्याचा अनुभव घेतलेलाच आहे. तेव्हा हेरगिरीची प्रकरणं भलतीच मनोरंजक असलीतरी शहाणे लोक त्यांच्यावर विश्‍वास मात्र जपूनच ठेवतात.
(सकाळबुधवारता. २१ सप्टेंबर २००५)